पावसाळ्यात होणारे आजार आणि उपचार

Homoeopathyandmagic in marathi language
0

 पावसाळ्यात होणारे आजार आणि उपचार



आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील काही दिवस असाच पाऊस राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. विशेषत: या काळात मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मुलं पावसाच्या साचलेल्या पाण्यात खेळतात आणि त्यांना रिमझिम थेंबात भिजायला आवडतं. त्यांची ही खेळकर वृत्ती त्यांना या ऋतूत आजारी पाडू शकते. तसेच याचा त्रास इतर वयोवर्गातील लोकांना देखील होतो.
अल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारा ऋतू म्हणजे पावसाळा. हा पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच आजारांना आमंत्रण देणाराही आहे. मान्सूनमध्ये इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत व्हायरस, जीवाणू आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यात अनेकदा डास,पाणी, हवा आणि अन्न यांच्या मार्फत संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या ऋतूमध्ये शारीरिक काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच या काळात नेमके कोणते आजार होतात आणि ते आजार कसे दूर ठेवायचे हे जाणून घेऊ.



पावसाळ्यात होणारे आजार
१.मलेरिया
हा आजार अ‍ॅनोफेलस जातीच्या डासांच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्यात, डबक्यात या डासांची पैदास होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि घामही येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
२.डेंग्यू
पहाटे तसेच सकाळच्या वेळी डास चावल्याने होणा-या या आजारात सततची डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे व स्नायूंमध्ये वेदना होतात. 

 लक्षणांमध्ये ताप आणि थकवा यांचा समावेश आहे. डेंग्यू तापासाठी विविध प्लेटलेट मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे.
३.चिकुनगुनिया-
हा विषाणू एडीस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो. यात दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ,पोट,कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात-पाय दुखणे सुरूच राहते.
४.टायफाइड
हा दुषित पाण्यामुळे पसरणारा आजार आहे. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे आहेत. टायफॉइड तापाची चाचणी करण्यासाठी टायफाइड टायफी आयजीएम आणि विडल एग्लूटिनेशन या चाचण्या करणे आवश्यक आहे.
५..लेप्टोस्पायरोसिस
त्वचेवर कुठे कापले असेल किंवा डोळे, तोंड आणि नाक यांचा प्राण्यांचे मूत्र किंवा प्राण्यांचे मूत्र असलेले पाणी यांच्याशी संपर्क झाला तर हा भयानक आजार उद्भवू शकतो. काहीही लक्षणं दिसून न येणे इथंपासून डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि पार फुफ्फुसात रक्‍तस्त्राव किंवा मेंदूदाह ही या आजाराची लक्षणे आहेत.
६. हिपेटायटीस
विषाणूमुळे होणारा हा खूपच संसर्गजन्य आजार आहे. पाण्यातून पसरणारा हा विषाणू असून बाधित विष्टेमुळे दूषित झालेल्या अन्‍न वा पाण्यामुळे हा आजार बळावतो. त्यामुळे कावीळ होते (पिवळे डोळे आणि त्वचा, गडद रंगाचे मूत्र) तसेच पोटदुखी, भूक मंदावणे, अन्‍नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्‍तपणा जाणवतो.
७.व्हायरल फिव्हर
यामध्ये सुरुवातीस तीव्र स्वरूपाचा ताप, अशक्तपणा जाणवणं, अंगदुखी हाता-पायांमध्ये वेदना होणं ही प्राथमिक लक्षणं दिसून येतात.
पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजारांसह त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोरायसिस यांसारखे विकारही उद्भवू शकतात. तसेच पावसात श्वसनविकाराची समस्या बळावते. त्यातच आता कोरोना असल्याने आजार वाढण्याची शक्यता अधिक असू शकते. पावसाळ्यात ताप, सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढतात. ही सर्व कोरोनाची लक्षणे आहेत. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासह आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात विविध संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

उपाय:-
दुषित पाणी पिऊ नये
पावसाच्या पाण्यात जमिनीवरील कचरा, घाण, सांडपाणी मिसळून ते प्रदूषित पाणी नदीमध्ये जात असते. त्यामुळे असे दुषित पाणी पिण्यामुळे उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, टायफॉइड आणि काविळ यांसारखे अनेक साथीचे आजार होत असतात. पावसाळ्यात गरम करून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
रोगप्रतिकाशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा :
आपल्या आहारात रंगीबेरंगी पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल. ब्रोकोली, गाजर,  हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद ही औषधी वनस्पती असून यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा समावेश आहे. सर्दी व खोकल्यासाठी लसून अतिशय गुणकारी आहे. व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. श्वसनाची समस्या असणाऱ्यांसाठी आले खाणे अतिशय फायदेशीर आहे. पावसाळ्यात भरपूर पाणी प्या.
जखम साफ करा
जर तुम्हाला काही जखमा किंवा कट असल्यास ताबडतोब साफ करा. कारण त्वचेला जखम असल्यास पावसाच्या पाण्यात गेल्यास जंतुसंसर्ग होण्याचा धोका सर्वांधिक असतो.
उघड्यावरील दुषित अन्न खाणे टाळावे : 
पावसायात बाहेरील उघड्यावरील पदार्थ, माशा बसलेले दूषित पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे कारण असे दुषित अन्न खाल्यामुळे पोटाचे विविध आझार, उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, काविळ यांसारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील दूषित अन्न खाणे टाळावेत.
डासांपासून स्वतःचा बचाव करा : 
पावसात डासांची मोठ्याप्रमाणात उत्पत्ती होतो. यामुळे डेंग्यू व मलेरिया यांसारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून बचाव करणे खूप गरजेचं आहे. यासाठी डास प्रतिकारक वापरा. डासांपासून बचाव करण्यासाठी घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आजुबाजूला पाणी साचू देऊ नका. घरामध्ये डास प्रतिबंधक जाळ्या, मच्छरदाणी औषधे, क्रीम यांचा वापर करावा. घरामध्येही फुलदाणी, फिशटॅंक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी. कारण अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते. 
पावसात भिजू नये :
पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला असतो. पुरसे ऊन नसल्याने हवेतील बॅक्टेरिया आणि जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळेच पावसाळ्यात सहजासहजी सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असतात. यासाठी पावसाच्या पाण्यात भिजणे टाळावेत. पावसात भिजल्यास गरम पाण्याने हात-पाय धुवून घ्यावेत. अंग व केस टॉवेलने पुसून घ्यावेत. कारण भिजलेल्या केसात फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पावसाळ्यात ओलसर कपडे घालणे टाळावे आणि पावसात भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत ते लगेचच बदलावेत.
नियमित व्यायाम करा :
बाहेर पाऊस पडत असला तरी घरी नियमित शारीरिक व्यायाम करा. कारण व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते.



























टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)